मुंबई विद्यापीठातील ‘कै. बाळासाहेब आपटे अध्यासन केंद्रा’च्या कामाला वेग; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात उभारण्यात येणाऱ्या कै. बाळासाहेब आपटे अध्यासन केंद्राच्या इमारत बांधकामाचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली.
नव्या इमारतीच्या बांधकामाची सध्याची प्रगती तपासून पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. हे अध्यासन केंद्र केवळ वेळेतच नव्हे, तर अत्यंत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. प्रकल्पात येणारे अडथळे दूर करून बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पामुळे मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक सुविधांमध्ये मोलाची भर पडणार असून, विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरेल.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अशोक मांडे, सहसचिव संतोष खोरगडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.