मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांची भेट; तब्येतीची केली विचारपूस

9

कोल्हापूर : ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विचारवंत आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रकृती काहीशी अस्वस्थ असल्यामुळे शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, डॉ. पवार सरांनी आपले संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राचा इतिहास आणि विशेषतः शिव-शाहू विचारांच्या संशोधनासाठी समर्पित केले आहे. त्यांनी लिहिलेले ‘राजर्षी शाहू छत्रपती’ हे चरित्र केवळ एक पुस्तक नसून, सामाजिक समतेचा इतिहास मांडणारा एक अनमोल दस्तऐवज आहे. ‘क्रांतिसिंह नाना पाटील’, ‘छत्रपती संभाजी महाराज’ आणि ‘मराठी सत्तेचा उदय’ यांसारख्या त्यांच्या अनेक ग्रंथांनी इतिहास संशोधनाला नवी दिशा दिली आहे.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ‘शाहू संशोधन केंद्रा’ची स्थापना करण्यात आणि शाहू महाराजांच्या कार्याला जागतिक स्तरावर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनाची आजच्या तरुण पिढीला मोठी गरज असल्याचे पाटील यांनी म्हटले.

अशा एका विद्वान व्यक्तिमत्त्वाची पाटील यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती घेतली असून, त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. डॉ. पवार सरांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो आणि ते पुन्हा एकदा त्याच जोमाने आपल्या लेखन-संशोधन कार्यात सक्रिय होवोत, हीच ईश्वरचरणी त्यांनी प्रार्थना केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.