माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी – मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली
पुणे :राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या निधनाबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मेघे यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राची मोठी पोकळी निर्माण झाली असून एक विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात दत्ता मेघे यांच्या कार्याचा गौरव केला. अमरावती जिल्ह्यातून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करत त्यांनी आमदार, खासदार तसेच राज्य मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. शिक्षण क्षेत्राच्या उभारणीत त्यांचे विशेष योगदान असून अनेक शैक्षणिक संस्था स्थापन करून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली केली. समाजकारण आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे ते सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय होते.
“ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि मेघे परिवाराला या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ देवो,” अशी प्रार्थना चंद्रकांत पाटील यांनी केली.
दत्ता मेघे यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची दारे उघडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नामवंत संस्था उभ्या राहिल्या. ते भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, सहकार आणि सार्वजनिक आरोग्य यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली. अमरावती आणि नागपूर पट्ट्यात त्यांचा मोठा जनसंपर्क होता.