मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित उमेदवारांची घेतली भेट; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा
मुंबई :विधान भवन, मुंबई येथे आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) च्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘साहित्य संवर्धन आघाडी’च्या पॅनेल मधून विजयी झालेल्या नवनिर्वाचित उमेदवारांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर तसेच सुनील महाजन, नितिन संगमनेरकर, संजय चाकणे, कुणाल ओंबासे, प्रसाद मिरासदार आणि सौ. सुनेत्रा मंकणी या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
“साहित्य संवर्धनासाठी आपल्या कार्याला नवी दिशा मिळो आणि मराठी साहित्यविश्व अधिक समृद्ध होवो,” अशा भावना मंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या. निवडून आलेल्या प्रतिनिधींनी मराठी भाषेच्या प्रगतीसाठी आणि लेखक-वाचकांच्या हितासाठी प्रभावी काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.