लोकमत साहित्य पुरस्कार २०२६ : साहित्यिकांसाठी मोठी घोषणा; पुरस्कारप्राप्त पुस्तकांच्या ५०० प्रती सरकार विकत घेणार – मंत्री चंद्रकांत पाटील
ठाणे : ठाणे येथील ऐतिहासिक गडकरी रंगायतन नाट्यगृहात मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी ‘दैनिक लोकमत साहित्य पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
राजहंस प्रकाशनचे ज्येष्ठ प्रकाशक दिलीप माजगावकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. सुमारे ८५० हून अधिक दर्जेदार पुस्तके प्रकाशित करून त्यांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध केले आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे पाटील यांनी म्हटले. तसेच उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी निवड झालेल्या ११ लेखकांचे व कवींचे देखील पाटील यांनी अभिनंदन केले.

यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन ‘गाव तिथे ग्रंथालय’ ही संकल्पना राबवत असून, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या सोहळ्यात गौरवण्यात आलेल्या ११ पुस्तकांच्या प्रत्येकी ५०० प्रती ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून खरेदी करण्याची घोषणा करताना मला विशेष आनंद होत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मालिकेचे लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांची मुलाखत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी घेतली. तसेच अभिनेते सचिन खेडेकर यांची ‘माझ्या वाचनाची गोष्ट’ ही विशेष मुलाखतही रंगली. या पुरस्कारांच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या दिग्गजांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी लोकमत मीडिया ग्रुपचे एडिटर-इन-चीफ राजेंद्रजी दर्डा, संपादक विजयजी बाविस्कर, अतुलजी कुलकर्णी, अभिनेते मकरंदजी अनासपुरे, सचिनजी खेडेकर, विद्याधरजी अनास्कर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.