महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण संस्था आता होणार ‘ऊर्जा स्वयंपूर्ण’! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

9

मुंबई : राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि आश्वासक निर्णय आज घेण्यात आला. राज्यातील शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये आणि तंत्रनिकेतनांमध्ये हरित ऊर्जेचा (Green Energy) वापर वाढवण्यासाठी आज तंत्रशिक्षण संचालनालय आणि MAHAPREIT यांच्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला.

याबाबत माहिती देताना पाटील म्हणाले, या उपक्रमामागचा आमचा मुख्य उद्देश शैक्षणिक संस्थांमधील वीज खर्चात बचत करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हा आहे. हा प्रकल्प RESCO मॉडेलवर आधारित असल्याने राज्य शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. संस्थांच्या इमारतींवर सौरऊर्जा संयंत्रे, स्मार्ट ग्रिड, ऊर्जा साठवणूक (Energy Storage) आणि ऊर्जा कार्यक्षम प्रणाली कार्यान्वित केल्या जातील.

केवळ ऊर्जा निर्मितीच नाही, तर सौरऊर्जा क्षेत्रात नवीन तांत्रिक अभ्यासक्रम विकसित करून आपल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. अत्याधुनिक चाचणी प्रयोगशाळांच्या माध्यमातून संशोधनालाही चालना मिळेल.

केंद्र आणि राज्य सरकारच्या हरित ऊर्जा धोरणाला अनुसरून उचललेले हे पाऊल आपल्या तंत्रशिक्षण संस्थांना शाश्वत विकासाकडे नेणारे ठरेल. यामुळे कार्बन फूटप्रिंट कमी होऊन आपल्या संस्था अधिक पर्यावरणपूरक होतील, याचा विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.