इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
कोल्हापूर : शिव-शाहू विचारांचे गाढे अभ्यासक आणि महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाचे संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातील एक देदीप्यमान पर्व संपुष्टात आले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे डॉ. पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी पवार परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. डॉ. पवार यांच्या निधनाने आपण एक मार्गदर्शक आणि शिव-शाहू विचारांचा खंदा पुरस्कर्ता गमावला असल्याची भावना मंत्री पाटील यांनी व्यक्त केली.
पाटील यांनी म्हटले कि, सरांशी असलेले माझे ऋणानुबंध जुने होते. इतिहासातील अनेक गुंतागुंतीचे विषय अत्यंत साध्या भाषेत समजावून सांगण्याची त्यांची हातोटी अफाट होती. त्यांचे लेखन आणि संशोधन येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असेही पाटील म्हणाले.
डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने कोल्हापूरच्या मातीतील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले असून, संपूर्ण महाराष्ट्र या दुःखद प्रसंगी पवार परिवाराच्या सोबत आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना पाटील यांनी केली.