पुण्यात ‘नृत्य महोत्सवा’चा दिमाखदार सोहळा; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे :पुण्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेत मानाचा तुरा रोवणाऱ्या आणि थोर नृत्यगुरू पं. रोहिणी भाटे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘नृत्य महोत्सवा’चे यंदा चौथे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या मंगलमयी सोहळ्याचे शानदार उद्घाटन करण्यात आले.

यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, खरं तर, तीन वर्षांपूर्वी जेव्हा या महोत्सवाची संकल्पना मांडण्यात आली, तेव्हा तो इतका लोकप्रिय आणि भव्य होईल याची कल्पना नव्हती. मात्र, रसिकांचा अलोट प्रतिसाद आणि कलाकारांची कठोर साधना यामुळे हा महोत्सव आता केवळ एक ‘कार्यक्रम’ उरलेला नाही, तर तो पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेतील एक ‘देदीप्यमान मेरुमणी’ ठरला आहे, याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले.

शास्त्रीय नृत्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी हे एक हक्काचे व्यासपीठ आहे, तर रसिकांसाठी ही दोन दिवसांची अपूर्व पर्वणीच! कलेची ही गंगा अशीच प्रवाही राहावी आणि हा महोत्सव दरवर्षी यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करो, अशी सदिच्छा देखील पाटील यांनी व्यक्त केली.
या सोहळ्याप्रसंगी महोत्सवाचे मुख्य संयोजक नगरसेवक पुनीत जोशी व अजय धोंगडे, नृत्यातील दिग्गज गुरू पं. शमा भाटे, पं. मनीषा साठे, पं. सुचेता चापेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेचे साधक आणि कलेवर प्रेम करणारे असंख्य रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.