सांस्कृतिक संवर्धन आणि विकासाचा नवा आयाम: आमचा संकल्प! – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : भारतीय संस्कृती हाच आपला खरा वारसा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘विरासत ते विकास’ या मंत्रानुसार महाराष्ट्र सरकार सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पुण्यात आयोजित ‘पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवा’ च्या निमित्ताने कोथरुड येथे ७५० हून अधिक नृत्यांगनांनी ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षानिमित्त सादर केलेला सामूहिक कलाविष्कार हा पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासातील एक सुवर्णक्षण ठरला.यावेळी मंत्री आशिष शेलार यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, पंडिता रोहिणीताई भाटे यांनी कथ्थक साधनेसाठी दिलेले योगदान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक विकासाची सांगड घालत आहोत. याच प्रवासाचा एक भाग म्हणून पुण्यात प्रस्तावित असलेले ‘नृत्यगृह’ आगामी काळात जगभरातील नृत्य साधकांसाठी एक प्रमुख केंद्र बनेल. आपली गौरवशाली परंपरा भावी पिढीसाठी जपणे, हाच आमचा खरा संकल्प असल्याचे पाटील यांनी म्हटले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कथ्थक या शास्त्रीय नृत्यासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या पं. रोहिणी भाटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आशिष शेलार यांनी म्हटले, भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेचा समृद्ध वारसा जपत, या महोत्सवात तब्बल ७५० नृत्यांगनांनी आपल्या अप्रतिम नृत्याविष्कारातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सादरीकरणात शास्त्रीय नृत्याची नजाकत, भावभावना आणि लयबद्धता यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
या सोहळ्याप्रसंगी पुणे महापौर मंजुषा नागपुरे, प्रख्यात नृत्यगुरू शमा भाटे, मनीषा साठे, सुचेता चापेकर, महोत्सवाचे मुख्य संयोजक नगरसेवक पुनीत जोशी आणि अजय धोंगडे यांच्यासह नृत्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.