केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचे मेहुणे ब्रिगेडियर डॉ. एन. के. शर्मा यांचे निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली
पुणे : भारतीय लष्करातील निवृत्त अधिकारी आणि प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ ब्रिगेडियर डॉ. एन. के. शर्मा यांचे पुण्यात निधन झाले. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचे मेहुणे होते. त्यांच्या निधनामुळे शर्मा आणि नड्डा परिवारावर शोककळा पसरली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुणे येथील डॉ. शर्मा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी पाटील यांनी जे. पी. नड्डाजी आणि शर्मा कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. “या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण नड्डा आणि शर्मा परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत,” अशा भावना मंत्री पाटील यांनी व्यक्त केल्या.
डॉ. शर्मा यांनी भारतीय लष्करामध्ये ब्रिगेडियर या वरिष्ठ पदावर राहून देशाची सेवा केली होती. केवळ एक शिस्तबद्ध लष्करी अधिकारीच नव्हे, तर एक निष्णात डॉक्टर म्हणूनही त्यांची मोठी ओळख होती. त्यांच्या निधनाने वैद्यकीय आणि संरक्षण क्षेत्रातील एका अनुभवी व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला आहे. आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये राहून त्यांनी जवानांच्या आरोग्यासाठी आणि लष्करी रुग्णालयांमध्ये महत्त्वाची सेवा बजावली. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी विविध संवेदनशील क्षेत्रांत आणि लष्करी तळांवर सेवा दिली.