मुंबईत ‘फ्युएल’ (FUEL) संस्थेचा एनएसई-सोशल स्टॉक एक्स्चेंजवर गौरव; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रंगला ‘बेल रिंगिंग’ सोहळा

5

मुंबई : सामाजिक क्षेत्रात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत, ‘फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्ह्स’ (FUEL) या संस्थेचा नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या सोशल स्टॉक एक्स्चेंज (SSE) वर नोंदणी सोहळा (Bell Ringing Ceremony) दिमाखात पार पडला. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहून ‘बेल’ वाजवून या नवीन प्रवासाचे स्वागत केले.

याबाबत माहिती देताना पाटील म्हणाले, या उपक्रमांतर्गत ९८.२९ लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे, ज्याचा विनियोग ४० गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी केला जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आणि AICTE मान्यताप्राप्त BBA अभ्यासक्रमाद्वारे या विद्यार्थिनींना केवळ दर्जेदार शिक्षणच मिळणार नाही, तर त्यांच्या उज्ज्वल करिअरचा मार्गही प्रशस्त होईल.

वंचित घटकातील मुलींना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. सामाजिक उत्तरदायित्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आपण महाराष्ट्राच्या शैक्षणिक भविष्याला नवी दिशा देऊ शकतो, असा मला विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले. विद्यार्थिनींच्या पुढील वाटचालीस पाटील यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास मंत्री मंगल प्रभात लोढा, NSE चे एमडी आणि सीईओ आशिष कुमार चौहान, ‘फ्युएल’ (FUEL) चे संस्थापक केतन देशपांडे आणि विविध नामवंत कंपन्यांचे CSR प्रमुख उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.