कणेरी मठात ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’चा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार शुभारंभ
कोल्हापूर : भारतीय संस्कृतीतील बारा बलुतेदारांच्या समृद्ध वारशाचे जतन करण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी कणेरी येथील श्री सिद्धगिरी संस्थान मठ आणि पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’ चे आयोजन करण्यात आले आहे. प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन उपस्थितीत आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, बारा बलुतेदारांच्या समृद्ध वारशाचे जतन आणि स्थानिक कलाकारांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या काळात चालणाऱ्या या महोत्सवात १७ राज्यांतील २०० हून अधिक राष्ट्रीय-राज्य स्तरावरील कलाकार सहभागी झाले आहेत. या अद्वितीय सोहळ्याला भेट देऊन आपल्या भारतीय कलेचा आणि कारागिरांचा उत्साह नक्की वाढवावा, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजींनी या महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय स्वयंपूर्ण खेडी आणि कारागिरांच्या प्रतिभेचा गौरव केला. हा महोत्सव दररोज सकाळी १०:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत हा महोत्सव सर्व जाणार आहेत. दररोज संध्याकाळी ६:०० नंतर विविध राज्यांचे लोकनृत्य, लोकसंगीत आणि पारंपारिक कलाप्रकार सादर केले जाणार आहेत.
या सोहळ्यास माजी आमदार प्रकाश आवाडे, उद्योगपती शंकर पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत, सभापती सारिका नांदेकर, सिद्धगिरी मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जी.पी. वढड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.