कोथरुडमध्ये ‘निसर्गछाया’ ज्येष्ठ नागरिक महामेळावा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न; सुरांची मैफिल आणि हास्ययोगाने रंगली संध्याकाळ
पुणे : “ज्येष्ठ नागरिक हे केवळ एका कुटुंबाचा आधार नसून, ते संपूर्ण समाजाला दिशा देणारे मार्गदर्शक आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना सन्मान आणि निखळ आनंद मिळावा, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोथरुड येथे ‘निसर्गछाया’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य ज्येष्ठ नागरिक महामेळाव्यात ते बोलत होते.

या महामेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांची रंगलेली विशेष मुलाखत होती. तसेच, मकरंद टिल्लू यांच्या हास्ययोग प्रात्यक्षिकांनी उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी फुलवली. यानंतर ऋषिकेश रानडे, स्वरदा गोडबोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या सुरांच्या मैफिलीने ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधला. या वयातही या नागरिकांचा उत्साह, चेहऱ्यावरील समाधान आणि या उपक्रमातील त्यांचा सक्रिय सहभाग पाहून मनस्वी आनंद झाला. आपल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद हीच आमची खरी शक्ती आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत असेही पाटील यांनी नमूद केले.
या सुंदर आणि नेटक्या आयोजनाबद्दल निमंत्रक सौ. अमृता देवगावकर आणि श्री. मंदार देवगावकर यांचे मंत्री महोदयांनी विशेष अभिनंदन केले. या मेळाव्याला कोथरुड परिसरातील हजारो ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.