‘अंत्योदय’ हाच आमच्या कार्याचा केंद्रबिंदू! – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण व्हावी, या उद्देशाने देशभरात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. याच अभियानांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील उत्तर, मध्य आणि दक्षिण मंडलाच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. या सत्रात सहभागी होऊन पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, हिंदू विचार हा केवळ एक ओळख नसून ती समर्पणाची शिकवण देणारी जीवनपद्धती आहे. प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहणे आणि दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद मानणे, हाच या विचाराचा गाभा आहे. याच उदात्त भावनेतून, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा ‘अंत्योदयाचा’ विचार तळागाळातील सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सदैव कार्यतत्पर राहावे, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
या प्रसंगी वक्ते गणेश घोष, शहर सरचिटणीस सुशील मेंगडे, उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, दक्षिण मंडल अध्यक्ष गिरीश खत्री यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.