विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी ‘बाटु’ विद्यापीठाची परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता ‘मिशन मोड’वर! – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि त्यांना देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध करून देणे, हे राज्य शासनाचे सर्वोच्च कर्तव्य आहे. लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या (DBATU) परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबाबत विद्यार्थी, पालक आणि लोकप्रतिनिधींच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या गंभीर बाबीची दखल घेऊन, आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठ प्रशासनाला कडक निर्देश दिले असून ही संपूर्ण प्रक्रिया आता ‘मिशन मोड’वर राबवून सर्व अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परीक्षांचे वेळापत्रक आणि निकाल प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी एक ठोस कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत.
परीक्षा सुधारणांचा दांडगा अनुभव असलेल्या प्रभारी कुलगुरूंकडे आता ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, पुढील ३ ते ६ महिन्यांत सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावून विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सज्ज करणे आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलद्वारे ‘सेंटर्स ऑफ एक्सलन्स’ उभारण्याचे आमचे व्हिजन असल्याचे पाटील म्हणाले.
विद्यार्थ्यांचे हित हेच शासनाचे मुख्य ध्येय असून, एकदा का परीक्षा आणि निकाल प्रक्रिया सुरळीत सुरू झाली की विसंलग्नीकरणाचा प्रश्नच उद्भवणार नाही. शैक्षणिक नियोजन सुस्थितीत आणण्यासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत, असे पाटील यांनी अधोरेखित केले.