मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली दिवंगत सुप्रिया सावळेकर, मकरंद लेले आणि ओमप्रकाश रांका यांना भावपूर्ण श्रद्धांजली

9

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे दौऱ्यादरम्यान शहरातील सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी पुष्पहार अर्पण करून मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.

पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका ॲड. मिताली सावळेकर यांच्या सासूबाई आणि भाजपा नेते कुलदीप सावळेकर यांच्या मातोश्री सुप्रिया सावळेकर यांचे नुकतेच निधन झाले. पाटील यांनी सावळेकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. “या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती ईश्वर सावळेकर कुटुंबियांना देवो,” अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मकरंद तथा दादा लेले यांच्या निधनाबद्दल पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. लेले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. “दादांच्या जाण्याने संघ परिवाराने एक समर्पित, अभ्यासू आणि ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे. त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

पुण्यातील नामवंत उद्योगपती आणि ‘रांका ज्वेलर्स’चे संचालक ओमप्रकाश रांका यांच्या निधनानंतर पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. पुण्याच्या व्यावसायिक आणि सामाजिक जडणघडणीत रांका यांचे योगदान मोठे असल्याचे सांगत त्यांनी रांका कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे नमूद केले.

या सांत्वनपर भेटींदरम्यान भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.