भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी आपण सर्वांनी पक्ष अधिक मजबूत केला पाहिजे – मंत्री चंद्रकांत पाटील

9

सांगली : भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त सांगली येथे आयोजित कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा यथोचित सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, आज पक्षाला ४६ वर्षे पूर्ण होत असली, तरी जनसंघाच्या काळापासून आपल्या कार्यकर्त्यांनी विचारांशी कधीही तडजोड न करता राजकीय जीवनात संघर्ष केला आहे. देशाचा राजकीय इतिहास आजच्या तरुण पिढीने आवर्जून अभ्यासला पाहिजे; कारण केवळ दोन खासदार असताना ज्या पक्षाची सर्वाधिक हेटाळणी झाली, तोच भाजपा आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे. केंद्रासह अनेक राज्यांत आज आपली सत्ता आहे आणि देश झपाट्याने प्रगती करत आहे.

पाटील पुढे म्हणाले, भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी आपण सर्वांनी पक्ष अधिक मजबूत केला पाहिजे. विशेषतः SIR ची प्रभावी अंमलबजावणी, डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत काम करावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक, शहर अध्यक्ष प्रकाश ढंग, माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते आण्णासाहेब डांगे, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, सांगलीचे महापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते संदीप आवटी, माजी आमदार भगवानराव साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.