महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात एक नवे आणि क्रांतिकारी पाऊल… विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधिष्ठित शिक्षणाची दारे खुली ; चार वर्षांच्या पदवीबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई : राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दिशेने आपण आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील विद्यापीठांमध्ये चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील (Honours & Honours with Research) चौथे वर्ष लागू करण्यास आज शासन मान्यता देण्यात आली आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली.
या निर्णयामुळे आपल्या विद्यार्थ्यांना संशोधनाभिमुख आणि कौशल्याधिष्ठित शिक्षणाची दारे खुली होतील. सर्व सार्वजनिक विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमाची एकसमान अंमलबजावणी व्हावी, यासाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वेही (Guidelines) जारी करण्यात आली आहेत.
या चार वर्षांच्या आराखड्यात विद्यार्थ्याला चौथ्या वर्षी संशोधनावर (Research) भर देता येईल, ज्यामुळे पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडीसाठी त्यांना मोठा फायदा होणार आहे.
पूर्वी पदवी (Degree) ३ वर्षांची असायची, आता ती ४ वर्षांची असेल. यात ‘मल्टिपल एन्ट्री आणि एक्झिट’ (Multiple Entry & Exit) ची सोय आहे, पण चौथ्या वर्षात दोन पर्याय मिळतात. हा पर्याय त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना एखाद्या विशिष्ट विषयात सखोल ज्ञान मिळवायचे आहे, पण संशोधनात (Research) फारसा रस नाही. चौथ्या वर्षात विद्यार्थी त्याच्या मुख्य विषयाचे (Major Subject) अधिक प्रगत पेपर्स आणि कौशल्य आधारित अभ्यासक्रम शिकतो. Honours with Research’ (ऑनर विथ रिसर्च) हा पर्याय त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना भविष्यात संशोधन क्षेत्रात करिअर करायचे आहे किंवा थेट पीएचडी (PhD) करायची आहे.