उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीदेवी फुले छात्रालय वसतिगृहाच्या बांधकामाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक संपन्न
मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सावित्रीदेवी फुले छात्रालय (चर्नी रोड, मुंबई) वसतिगृहाच्या बांधकामाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत वसतिगृहाच्या बांधकामाची प्रगती, कामाची गती तसेच उर्वरित कामांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. विद्यार्थिनींसाठी आधुनिक, सुरक्षित आणि सर्व सुविधांनी युक्त असे हे वसतिगृह उभारले जात असून, त्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना यावेळी मंत्री पाटील यांनी दिल्या. पावसाळ्यापूर्वीच बांधकाम पूर्ण व्हावे, यासाठी कामाची गती वाढवून आवश्यक ती सर्व यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसचिव प्रताप लुबाळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.