पुण्यात भाजपचा ‘सक्रिय कार्यकर्ता’ संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न; हे संमेलन म्हणजे कार्यकर्त्यांसाठी ऊर्जेचा अक्षय स्रोत – मंत्री चंद्रकांत पाटील

13

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, मंगळवारी पुणे शहर भाजपाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिव प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सक्रिय कार्यकर्ता संमेलन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या संमेलनास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

याबाबत माहिती देताना पाटील म्हणाले, आजचे हे संमेलन म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी तो ऊर्जेचा एक अक्षय स्रोत होता. रविंद्रजी आणि शिव प्रकाशजी यांच्या मार्गदर्शनाने आम्हा सर्वांमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे. ही ऊर्जा आगामी वर्षभरातील संघटनात्मक कार्यासाठी आणि पक्षवाढीसाठी निश्चितच मैलाचा दगड ठरेल, असा मला ठाम विश्वास असल्याचे देखील पाटील यांनी म्हटले.

यावेळी संबोधित करताना रवींद्र चव्हाण म्हणाले, २०२४च्या लोकसभा निवडणुकीत डिजिटल माध्यमाद्वारे पसरलेल्या फेक नरेटीव्हचा आपल्याला फटका बसला, हे पुन्हा होऊ न देण्यासाठी प्रत्येकाने सोशल मीडियावर सक्रीय राहणं अत्यंत गरजेचं आहे. यासोबतच दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी भाजपाच्या प्रत्येक कार्यालयात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण आणि मासिक बैठक झाली पाहिजे, यादृष्टीने नियोजन करण्याचे त्यांनी आवाहन केले.

याप्रसंगी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, महापौर मंजुषा नागपुरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजपा गटनेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासह पुणे शहरातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि माझे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.