विद्यापीठे, महाविद्यालयांमधील रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा होणार; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा

7

मुंबई : राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि ग्रंथालयांमधील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भरती प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि ग्रंथालयांमधील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणींचा आढावा यावेळी पाटील यांनी घेतला, तसेच यावर तातडीने काय उपाययोजना करता येतील, याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा देखील त्यांनी केली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये पूर्ण क्षमतेने मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. रिक्त पदे भरण्याबाबत असलेल्या अडचणींवर कालबद्ध पद्धतीने मात करून ही प्रक्रिया गतिमान करण्यात येईल, असे यावेळी ठरवण्यात आले.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, कोल्हापूर विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव, नागपूर विभागाचे सहसंचालक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.