मंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘अभाविप’ केंद्रीय कार्यालयाला सदिच्छा भेट… राष्ट्रहित आणि शैक्षणिक विषयांवर झाली चर्चा
मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईतील ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (ABVP) च्या केंद्रीय कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अभाविपचे संघटन मंत्री गीतेशजी चव्हाण आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला.
या महत्त्वपूर्ण भेटीत प्रामुख्याने राज्यातील राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील सद्यस्थिती, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या भविष्यातील संधी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तरुणाईच्या मनात राष्ट्रहित आणि दर्जेदार शिक्षणाबद्दल असलेली ओढ पाहून पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी शक्ती हीच राष्ट्रशक्ती असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असा विश्वासही पाटील यांनी यावेळी दिला.