भारतीय संगीतविश्वातील लोकप्रिय आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन … एक सूर निःशब्द झाला – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

17

पुणे : भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांनी आज जगाचा निरोप घेतला. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या दुपारी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तब्बल आठ दशकांहून अधिक काळ आपल्या चिरतरुण आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाताई आज आपल्यात नाहीत याबातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीसह जगभरातील गायन व कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील हालहाल व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, आशाताई भोसले यांच्या निधनामुळे सप्तसुरांपैकी एक सूरच जणू निःशब्द झाला आहे. महाराष्ट्र, भारतच नव्हे तर संपूर्ण गानविश्वावरच हा फार मोठा आघात आहे. नव्वदीनंतरही आशाताईंचा गळा गात होता. नव्वदाव्या वाढदिवशीही आशाताई गायल्या. अनेक भाषांतून त्यांनी अक्षरशः हजारो गाणी गायली. संगीतकार आर. डी. बर्मन आणि गायिका आशाताई भोसले या जोडीनं काही दशकं हिंदी चित्रपटसृष्टीवर जणू राज्यच केलं. हिंदी-मराठीतली त्यांनी गायलेली अनेक अनेक गाणी नेहमीच आठवत राहतील. ती गाणी अजरामर आहेत आणि राहतीलही. आशाताईंची गाणी, त्यातल्या हरकती… अनेक नवोदित गायकांना त्यांची गाणी ऐकूनही बरंच काही शिकायला मिळालं असेल.

गानकोकिळा लताताई मंगेशकर यांच्या नावानं भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबईत सुरू झालं. त्या प्रक्रियेत आशाताईंचीही भेट झाली. त्यांच्या आवाजातला गोडवा शब्दांत काय सांगणार. अनेक रागांवर बेतलेली, अनेक भाव-भावना गाण्यांतून सहज व्यक्त करणारा तो आवाज कधीच विसरता येणार नाही! आशाताई, तुम्ही भले इहलोकीचा निरोप घेतलात, तरी माझ्यासारख्या लाखो-कोट्यवधी चाहत्यांच्या मनात तुम्ही कायमचं अढळपद राखून आहात. हा आघात सहन करण्याचे बळ आप्तस्वकीय आणि चाहत्यांना लाभो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना! अशा शब्दात पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तब्बल ८ दशकांहून अधिक काळ आशाताईंनी भारतीय संगीतावर अधिराज्य गाजवलं. २० हून अधिक भाषांमध्ये १२,५०० हून अधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांनी केला. त्यांना पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके, महाराष्ट्र भूषण सह अनेक मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.