“माझी जडणघडण ‘ज्ञानेश्वरी’च्या सावलीत झाली”; पुण्यात पुरस्कार सोहळ्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भावना

8

पुणे : पुणे येथे संत विचार प्रबोधिनी आणि डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानच्या वतीने एका अत्यंत प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंत्री उदय सामंत यांच्या समवेत, संत नामदेव महाराजांचे १६ वे वंशज हभप केशव महाराज नामदास यांना ‘डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनसेवा पुरस्कार’ आणि पंढरपूरच्या प्रसिद्ध भारुडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांना ‘लोककला सेवा पुरस्कार’ प्रदान केला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वतःची जडणघडण ही ‘ज्ञानेश्वरी’च्या सावलीत आणि त्यातील विचारांमुळे झाली आहे, त्यामुळे वारकरी संप्रदायाशी माझे एक अतूट आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. समाजप्रबोधन करताना वारकरी बांधव सामान्यातल्या सामान्य माणसालाही ‘स्व’ची ओळख अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत करून देतात, हे या संप्रदायाचे मोठेपण आहे. हिंदू संस्कृतीने आपल्याला नेहमीच स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याला मोठे करण्यात आणि दुसऱ्याच्या सुखात आनंद मानण्याची शिकवण दिली आहे. हीच जीवनमूल्ये कीर्तन सेवेच्या माध्यमातून जनमानसात रुजवण्याचे आणि समाजाला सुसंस्कृत करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आज घडत आहे, असे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले. संतांच्या विचारांचा हा जागर असाच अखंड सुरू राहावा, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना, असे म्हणत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या मंगलमय सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद मोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भावार्थ देखणे, हभप पुरुषोत्तम पाटील, सचिन इटकर, ॲड. राजेंद्र उमप, हभप उमेश महाराज मोरे, हभप नितीन महाराज मोरे, बीव्हीजी ग्रुपचे हणमंत गायकवाड, ज्ञानेश्वर तापकीर, कबीर महाराज लोंढे आणि योगी निरंजन नाथ यांच्यासह अनेक मान्यवर, संत साहित्याचे अभ्यासक आणि मोठ्या संख्येने वारकरी बांधव उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.