जवानांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; SNBP मोरवाडीच्या चिमुकल्यांनी नृत्यातून आणि गायनातून दिली कृतज्ञतेची सलामी

9

पिंपरी : ‘जागतिक नृत्य दिना’चे औचित्य साधून मोरवाडी येथील SNBP इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलग चौथ्या वर्षी खडकी येथील ‘पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर’ (PRC) ला भेट दिली. आपल्या चैतन्यमय सांस्कृतिक सादरीकरणातून आणि जवानांशी साधलेल्या अर्थपूर्ण संवादातून विद्यार्थ्यांनी या केंद्रात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले.

कार्यक्रमाची सुरुवात वीर सावरकर यांनी रचलेल्या आणि लता मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या ‘जयोस्तुते’ या गीताने झाली. त्यानंतर, धर्मवीर संभाजी महाराजांना समर्पित ‘तुफान’ हे जोशपूर्ण गीत सादर करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहणाऱ्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत सादर केले, ज्यामुळे उपस्थित सर्वच भावूक झाले होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी भारताच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवत कथक आणि भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यांसह भांगडा, हरियाणवी लोकनृत्य, गोव्याचे नृत्य आणि महाराष्ट्राचा पारंपारिक ‘गोंधळ’ सादर केला. ‘देस रंगीला’ या गीतावरील नृत्याने ‘विविधतेतील एकता’ हे भारतीय तत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले.

‘पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर’चे सदस्य व संचालक, तसेच ‘स्केचपेंटएक्सप्रेस’चे विजय कुमार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हटले की, “ही सादरीकरणे खरोखरच उत्साहवर्धक होती आणि त्यांनी येथील प्रत्येकाला असीम आनंद दिला. या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. या कार्यक्रमाने केवळ कलेची वैश्विक भाषाच साजरी केली नाही, तर तरुण पिढीला समाजातील खऱ्या नायकांशी जोडून घेण्याचे मोलाचे कार्यही साधले. सकारात्मकतेने भारलेल्या या वातावरणाने जवानांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले.

SNBP इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. प्रियांका अग्रहरी यांनी यावेळी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले कि, “अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना सहानुभूती, सामाजिक जबाबदारी आणि आनंद वाटून घेण्याचे महत्त्व समजून घेण्यास मदत होते.”

शाळेची ही सांस्कृतिक मोहीम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांनी CME आणि QMTI सारख्या लष्करी केंद्रांमध्येही आपली कला सादर केली आहे. भारतीय लष्कराशी असलेले नाते जपणे आणि कलेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव निर्माण करणे हा शाळेचा मुख्य उद्देश आहे.

यावेळी खडकी, पुणे येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर (PRC) चे वैद्यकीय संचालक आणि सचिव डॉ. कर्नल आर. के. मुखर्जी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच SNBP State Board च्या मुख्याध्यापिका सौ. परमजित अरोरा यासोबतच शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांची देखील उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे ‘पॅराप्लेजिक सेंटर’चे संचालक आणि मान्यवरांनीही भरभरून कौतुक केले. या उपक्रमामुळे शाळा आणि समाज यांच्यातील नाते अधिक घट्ट होण्यास मदत झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.