सीओईपी (COEP) मधील गरजू विद्यार्थिनींना दरमहा ₹१०,००० ची शिष्यवृत्ती प्रदान; ‘पुनर्निर्माण सोशल फाउंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम
पुणे : ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींच्या उच्च शिक्षणाला खंबीर आधार देण्यासाठी ‘पुनर्निर्माण सोशल फाउंडेशन’च्या वतीने पुणे येथील नामांकित सीओईपी (COEP) तंत्रज्ञान विद्यापीठातील (अभियांत्रिकी महाविद्यालय) विद्यार्थिनींना दरमहा ₹१०,००० हजार ची शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष राजेश राठोड यांच्या शुभहस्ते या शिष्यवृत्तीचे अधिकृत वितरण करण्यात आले.
राज्य शासनाने मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण लागू केले असले, तरी शहरात राहून शिक्षण घेताना येणारा इतर दैनंदिन खर्च, पुस्तके आणि राहण्याचा खर्च यामुळे गरजू कुटुंबांना मोठी आर्थिक काटकसर करावी लागते. हीच अडचण ओळखून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, “मुलींची ही आर्थिक काटकसर थांबावी आणि त्यांनी शिक्षणाचा आनंद मोकळेपणाने घ्यावा, यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढाकार घ्यावा,” असे जाहीर आवाहन केले होते.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या आवाहनाला तातडीने आणि सकारात्मक प्रतिसाद देत पुनर्निर्माण सोशल फाउंडेशनने हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. फाउंडेशनचे हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असून, यामुळे ग्रामीण भागातील गुणवंत मुलींच्या उच्च शिक्षणाला नक्कीच मोठे बळ मिळेल आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.