करमाळा तालुक्याची लेक नम्रता शिंदे यांना राज्यस्तरीय ‘सावित्रीबाई फुले महिला गौरव पुरस्कार’ जाहीर; अलिबाग येथील आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल

154

बुलढाणा : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील खातगाव येथील सुकन्या व अलिबाग (जि. रायगड) येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या समाजसेवा अधीक्षक नम्रता सिंधुदेवी राजेंद्र रणसिंग (सौ. नम्रता शिवाजी शिंदे) यांना या वर्षाचा प्रतिष्ठित राज्यस्तरीय ‘न्यायहक्क समताशाही सावित्रीबाई फुले महिला गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील लोकसेवा क्रीडा व शिक्षण बहुउद्देशीय संस्था (मारोतीपेठ) यांच्या वतीने दै. न्यायहक्क समताशाही आणि जानेफळ एक्सप्रेसच्या संयुक्त वर्धापन दिनानिमित्त हा गौरव प्रदान केला जाणार आहे. संस्थेचे अध्यक्ष अशोकभाऊ शेजूळ आणि पुरस्कार निवड समितीचे अनिल भगवान चव्हाण यांनी अधिकृत पत्रकाद्वारे या निवडीची घोषणा केली.

आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य

नम्रता शिंदे या सध्या अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात समाजसेवा विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आरोग्य क्षेत्रात मोठी जनजागृती केली असून, विशेषतः एचआयव्ही (HIV) आणि सिकलसेल ॲनिमिया सारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. याशिवाय दिव्यांग व्यक्ती आणि किशोरवयीन मुलींसाठी विशेष जनजागृती अभियाने व आरोग्य शिबिरांचे आयोजन त्यांनी केले आहे.

सीएसआर (CSR) निधीतून समाजकार्य आणि साहित्याची आवड

आपल्या प्रशासकीय पदाचा उपयोग करत नम्रता शिंदे यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आणि त्यातून विविध लोककल्याणकारी कामे यशस्वीपणे पूर्ण केली. प्रशासकीय सेवेसोबतच त्यांनी आपली शैक्षणिक व साहित्याची आवडही जोपासली असून, विविध नामांकित संस्थांच्या पदांवर त्यांची निवड झाली आहे.

जानेवारी २०२७ मध्ये मेहकर येथे होणार गौरव

आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या या निरंतर योगदानाची दखल घेऊन जानेवारी २०२७ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे आयोजित विशेष सोहळ्यात त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार अधिकृतपणे प्रदान करण्यात येणार आहे.

हा बहुमानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नम्रता शिंदे यांच्यावर सोलापूर, रायगड आणि बुलढाणा जिल्ह्यातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.