‘डॅडी’ला रजा मंजूर, नागपुरच्या कारागृहातून सुटका

4

नागपूर : नगरसेवकाच्या खूनप्रकरणात नागपूर जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर डॅडी उर्फ अरुण गवळीला २८ दिवसांची ‘संचित रजा’ मंजूर केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ‘संचित रजा’ मंजूर केली आहे. मात्र, मुंबईची निवडणूक झाल्यानंतर त्यांची सुट्टी लागून होईल असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री अरूण गवळीची सुटका करण्यात आली.

अरुण गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खूनाच्या आरोपात जन्मठेप झाली असून तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. कारागृहात दाखल झाल्यापासून पत्नीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी, मुलाचे लग्न, आईचा मृत्यू अशा प्रसंगी वेळोवेळी संचित रजा म्हणजेच फर्लो तर कधी अभिवचन रजा घेतल्या. फेब्रुवारीमध्ये त्याने पुन्हा कारागृह उपमहानिरीक्षकांकडे अर्ज करून संचित रजा मिळण्याचा अर्ज केला होता. त्यानंतर उपमहानिरीक्षकांनी त्याचा अर्ज फेटाळला. तर यानंतर त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

दरम्यान निवडणूकीच्या काळात त्याला सुटी दिल्यास तो मुंबईत आला तर काहीतरी अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे. असे सांगत सरकारने त्याच्या रजेला विरोध केला होता. परंतु यापुर्वी त्याने सहा वेळा फर्लो व पॅरोलवर सुटी घेतली. त्यानंतर अटींचे उल्लंघन न करता दिलेल्या तारखेला तो तुरुंगात परतला आहे. असे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायाधीश झका हक आणि न्या. विनय जोशी यांनी गवळीला २८ दिवसांची रजा मंजूर केली. त्यानुसार काल संध्याकाळी अरुण गवळी ला २८ दिवसांच्या संचित रजेवर सोडण्यात आले आहे.