‘व्हीलन नंबर १’ – धनंजय मुंडेंचा मोदींवर निशाणा

13

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टाईम मॅगझीनने पंतप्रधान मोदींबाबत लिहिलेल्या लेखावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न दाखवणाऱ्यांनीच देशाचे नाव धुळीस मिळवले आहे अशी टीका धनंजय मुंडे यांनी ट्विटर वरून केली आहे.

अमेरिकेतील जगप्रसिद्ध असणाऱ्या टाईम मॅगझीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत लिहिलेल्या लेखामध्ये दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता असा उल्लेख करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी हिंदुत्वाचे राजकारण करत आहेत. त्यामुळे देशात ध्रुवीकरण झाले आहे. लोकप्रियतेमुळे कोलमडलेली लोकशाही म्हणून भारताचा उल्लेख करता येईल. असेही त्या लेखामध्ये म्हंटले आहे. याचबरोबर २०१४ पासून भारतामध्ये अनेक बदल झाले असल्याचेही त्यामध्ये म्हंटले आहे.

याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. “टाईम मॅगझीनने वेळोवेळी ‘व्हीलन नंबर १’ चा खरा चेहरा समोर आणला आहे. भारतातील खरी ‘तुकडे तुकडे गँग’ आणि त्यांच्या प्रमुखाला जगासमोर आणण्यासाठी टाईमचे आभार. भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न दाखवणाऱ्यांनीच देशाचे नाव धुळीस मिळवले.” असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.