यो यो हनी सिंगविरुद्ध हिंसा, लैंगिक व मानसिक छळ आणि आर्थिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

बॉलिवूड गायक आणि अभिनेता यो यो हनी सिंग (हिरदेश सिंग) याच्यावर पत्नी शालिनी तलवार हिने ‘घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण’ अंतर्गत याचिका दाखल केली आहे. शालिनी तलवारने घरगुती हिंसा, लैंगिक व मानसिक छळ आणि आर्थिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली येथील तिस हजारी न्यायालयाच्या मुख्य महानगर दंडाधिकारी तानिया सिंग यांच्याकडे आज म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. शालिनीने गुन्हा दाखल केल्यानंतर महानगर दंडाधिकारी तानिया सिंग यांनी गायक आणि अभिनेता हनी सिंगला त्वरित नोटीस जारी केली आहे.

हनी सिंग यांची पत्नी शालिनी तलवार यांच्या वतीने लॉ फर्म कारंजावाला अँड कंपनीचे वकील संदीप कपूर, अपूर्व पांडे आणि जीजी कश्यप ह्यावेळी हजर होते. न्यायालयाने हनी सिंग यांना 28 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच शालिनी तलवार यांच्या बाजूने अंतरिम आदेश देत हनी सिंग यांच्यासोबत असलेल्या संयुक्त मालकीच्या मालमत्तेला हात लावण्यास मनाई केली आहे.

हनी सिंगच्या पत्नीने हनी सिंगरवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शालिनीने हनी सिंगवर शारीरिक हिंसा, लैंगिक हिंसा, मानसिक छळ आणि आर्थिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. शालिनीने न्यायालयात सांगितले की, तिचे स्त्रीधन तिला परत करावे आणि तिच्या आणि हनी सिंगच्या नावावर असलेली मालमत्ता विकण्यास बंदी घालण्यात यावी.

हनी सिंह आणि शनीली तलवार यांनी 20 वर्षांच्या मैत्री आणि प्रेमानंतर 2011 मध्ये लग्न केले. शीख रितीरिवाजानुसार दोघांनी दिल्लीच्या फार्महाऊसमध्ये लग्न केले होते. 2014 मध्ये, हनी सिंगने रियालिटी शो इंडियाज रॉकस्टारच्या एका एपिसोडमध्ये आपल्या पत्नीची प्रेक्षकांशी ओळख करून दिली.