प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई: प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज  यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. रविवारी मध्यरात्री दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिरजू महाराज यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. पंडित बिरजू महाराज यांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त केले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

पंडित बिरजू महाराज यांची प्रकृती रविवारी मध्यरात्री अचानक खालावली आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना दिल्लीतील साकेत रुग्णालयात घेऊन जाण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पंडित बिरजू महाराज यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. अदनान सामीनं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, ‘महान कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख झाले. आज आपण कलेच्या क्षेत्रातील एक अनोखी संस्था गमावली आहे. त्यांनी आपल्या प्रतिभेने अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे.’

लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला होता. बिरजू महाराज यांचे खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होते. कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते. बिरजू महाराज यांनी बॉलिवूडच्या ‘देवदास’, ‘देढ इश्किया’, ‘उमराव जान’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केले होते. याशिवाय सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटातही त्यांनी संगीत दिले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!