काँग्रेसकडून राज्यसभेच्या जागेसाठी रजनी पाटील यांना उमेदवारी
मुंबई: काँग्रेसचे नेते तथा गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसनं उमेदवाराची घोषणा केलीय. रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीय. राजीव सातव यांच्या निधनानं एक जागा रिक्त झाली होती, त्यांच्या जागेवर आता रजनी पाटील निवडणूक लढवतील. रजनी पाटील ह्या सध्या जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी आहेत.
Congress President Smt. Sonia Gandhi has approved the candidature of Smt. Rajani Patil as Congress candidate for the ensuing bye-election to RS from Maharashtra. pic.twitter.com/0R1qGz3AmK
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 20, 2021
त्या आधीही राज्यसभेवर होत्या. त्यानंतर आता त्यांना पुन्हा संधी देण्यात आलीय. विशेष म्हणजे विधान परिषदेसाठीही राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीतही रजनी पाटील यांचं नाव आहे. तो निर्णय़ अजून राज्यपालांकडे प्रलंबित आहे. त्याच पार्श्वभूमीवर रजनी पाटील यांना उमेदवारी दिली गेलीय. विशेष म्हणजे आज सकाळीच भाजपानं राज्यसभेच्या एका जागेची निवडणूक लढण्याची घोषणा केलीय. त्यात संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आलीय.
राजीव सातव यांच्या निधनानं जागा रिक्त
काँग्रेसनं राजीव सातव यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. राजीव सातव यांना कोरोनासंसर्ग झाल्यानं पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात राजीव सातव यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, 16 मे रोजी राजीव सातव यांचं कोरोनामुळं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्रातून राजीव सातव यांच्या जागी कुणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे.
भाजपकडून संजय उपाध्याय
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेबाबत भाजपकडून कोण लढवणार? याबाबतचा सस्पेन्स संपुष्टात आला आहे. भाजपकडून संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. राज्यसभा भाजप लढणार आहे. मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय हे आमचे राज्यसभेचे उमेदवार असतील. 22 तारखेला सकाळी 11 वाजता ते फॉर्म भरायला जाणार आहेत, अशी घोषणा पाटील यांनी केली.