शेकापचे जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन

1

कोल्हापूर: शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापुरातील एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं अशी प्रतिक्रिया येत आहे. शेतकऱ्यांच्या विषयावर शेकापचे एक झुंजार नेतृत्व म्हणून त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात दरारा होता. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना मृत घोषित केले.

प्रा. एन. डी पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यांचे पार्थिव हे शाहू कॉलेज येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. एन डी पाटील यांच्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोल्हापूरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना लागोपाठ दोन वेळा ब्रेन स्ट्रोक येऊन गेला होता. त्यामुळे त्यांना बोलताही येत नव्हते. त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली. अखेर आज दुपारी १२ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली.

राजकीय कारकीर्द

१९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

१९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस

१९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य

१९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस

१९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य

१९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )

१९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार

महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला नेता हरपला – शरद पवार

कार्यकर्त्यांचे छत्र हरपले – राजू शेट्टी

भूमी अधिगृहणाची चळवळ असो ऊस दराचा मुद्दा असो किंवा विजेचा प्रश्न असो, तसेच रायगडमधील एसईझेडचा प्रश्न असो अत्यंत पोटतिडकीने हा प्रश्न मांडण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. शेतकऱ्यांचा प्रश्न सुटल्याशिवाय ते मागे हटत नसत. नुकत्याच लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात ते व्हील चेअरवर येऊन आंदोलनात सहभागी झाले. माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांचे छत्र हरपले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.