“मी असते तर थोबाड फोडलं असतं,” महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात….
मुंबई: मुंबईत बोरिवलीमध्ये भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेवर महिलेचा लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ ऑगस्टला बोरिवलीत ही घटना घडली. य़ा घटनेवरुन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. आता भाजपाची ताईगिरी गेली कुठे? असा सवालही त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना विचारला आहे. दिव्याखाली अंधार असून दुसऱ्याचं पहायचं आणि आपलं झाकायचं असा प्रकार असल्याची टीकाही यावेळी त्यांनी भाजपावर केली.
भाजपच्या महिला आता गप्प का? दिव्याखाली अंधार आहे. भाजप नेहमीच महाराष्ट्राला बदमान करण्याचा प्रयत्नात असते. खोटं रडून दाखवता. भाजपशासित राज्यात महिलां अत्याचाराच्या घटना खूप घडत आहेत. आता ताईंगिरी कुठे गेली? फोन बंद का? असा हल्लाबोल महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर केला.
मी स्वत: बोरिवलीच्या प्रकरणात लक्ष घालणार आहे, पोलिस स्टेशनला जाणार आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. केवळ महाराष्ट्र बदनाम करण्याचं काम भाजपकडून होतं. भाजपच्या ताई पब्लिक स्टंटसाठी पुढे येणार आणि आता गप्प बसणार? आज महिलांच्या विषयावर धाय मोकलून रडणा-या भाजपच्या ताईंचा फोन सकाळपासूनच स्विच ऑफ आहे, त्यांच्या पक्षातील कुणीच याबाबत बोलायला तयार नाही. कोणत्याही पक्षाची महिला असो, अन्याय होत असेल तर भूमीका घेतली पाहिजे, मी असते तर थोबाड फोडून टाकलं असतं, असा हल्लाबोल किशोरी पेडणेकर यांनी केला.
चित्रा वाघ यांची किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका
“या प्रकरणात कोणीच आरोपींना पाठीशी घालत नाहीये. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी कसून चौकशी करावी. या प्रकरणाशी संबंधित काही लोकांचे व्हिडिओ आमच्याकडे आले आहेत, ते आम्ही पोलिसांना देणार आहोत. ज्या भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात ही घटना घडली, त्या नगरसेविकेने पोलिसांना यासंदर्भात माहिती देणारं पत्र दिलं आहे. तसेच पीडित महिला ही नगरसेविकाला या गुन्ह्यात खोटं अडकवण्याची धमकी देत असल्याचंही म्हटलंय. पीडिता धमकी देत असली तरी आम्ही तिच्या बाजूने आहोत, पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसंच वर्ष उलटूनही बोरीवली पोलिसांनी तक्रार दाखल का करून घेतली नाही,” असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.
दरम्यान महापौर पेडणेकर यांनी थोबाड फोडण्याच्या केलेल्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. विनोद घोसाळकर यांनी महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याच्या घटनेचा संदर्भ देत, तेव्हा तुम्हाला त्यांचं थोबाड फोडावं वाटलं नाही का? असा सवाल केला. तसेच तुमच्याच पक्षाच्या माजी महापौरांनी भर रस्त्यात एका महिलेचा हात पिरगळला होता, तेव्हा तुम्हाला त्याचं थोबाड फोडावं वाटलं नाही का? असंही चित्रा वाघ यांनी विचारलं. दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं थोबाड फोडण्याची भाषा करताना आपल्या पक्षातील अशा लोकांकडे कानाडोळा करणं तुम्हाला शोभत नाही, असं वाघ किशोरी पेडणेकर यांना म्हणाल्या.