तुम्ही कितीही करा हल्ला, पण मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला – महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या व्हॉट्सअप चॅट बॉट सेवेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले. काही चूक झाली की लगेच महापालिकेला दोष दिला जातो. महापालिका काय करते? असा प्रश्न विचारला जातो. प्रश्नांचा भडिमार होत असते. प्रश्न विचारणे सोपे आहे. त्याला अक्कल लागत नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. याला भाजपचे आमदार अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. तसेच त्यांच्यावर सडकून टीका केली. साटम यांच्या टीकेवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला.

भाजपचे राजकारण खालच्या पातळीला जातेय. तुम्ही कितीही करा हल्ला, शिवसेनेचा मजबूत आहे किल्ला, असे म्हणत महापौर किशोरी पेडणेकर यांनी साटम यांच्यावर निशाणा साधला. पेडणेकर म्हणाल्या, जेव्हा इतकी वर्षे तुम्ही बरोबर होतात तेव्हा काय केलं? तुमच्या बुद्धीला तेव्हा गंज होता का? अविश्वास ठराव सर्वानुमते संमत व्हावा लागतो. तुमच्यासारखं मीडियासमोर झळकायचं काम नाही, अशा शब्दात त्यांनी भाजप नेत्यांवर ताशेरे ओढले. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अमित साटम यांनी केला. यावरही पेडणेकर यांनी भाष्य केले. आम्ही चांगले काम करत असल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे, असे त्या म्हणल्या.

दरम्यान मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्षांविरोधात भाजप अविश्वास ठराव मांडणार आहे. यशवंत जाधव यासारख्या सहकाऱ्यांवर त्यांना अभिमान असेलच. आयकर विभागाच्या तपासात १५ कोटींचा मनी लॉन्ड्रिंग केल्याचा पुरावा, त्यात जबाब नोंदवला गेला आहे. प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीचे शेअर्स आपल्या मुलांच्या नावावर करून अनसिक्युअर्ड लोन दाखवून कशा प्रकारे १५ कोटींची फसवणूक केली, स्थायी समितीच्या टक्केवारीतून मिळवलेला पैसा कशा प्रकारे त्या ठिकाणी फिरवण्यात आला हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांच्या सहकाऱ्यांवर अभिमान तर असेलच, असे साटम पत्रकार परिषदेत म्हणाले.