माणुसकीला काळीमा फासणारी घटना: संपत्तीच्या हव्यासातून कुटुंबातील 5 जणांची हत्या

गाझियाबाद: एकदा का माणसाला पैसे आणि मालमत्तेची लालच लागली की तो माणूस काहीही करायला तयार होतो. अगदी संपत्तीच्या हव्यासातून आपल्याच रक्ताच्या नात्याच्या लोकांचे रक्त पिण्यासही काही सैतानी वृत्तीचे लोक मागे पुढे पाहत नाहीत. उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमध्ये अशीच धक्कादायक घटना घडली असून या घटनेतील सीरिअल किलरने मानवतेला काळिमा फासणारे अत्यंत क्रूर कृत्य केले. मागील 20 वर्षात त्याने घरातच राहून आपल्याच कुटुंबातील 5 जणांच्या हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण उत्तरप्रदेश हादरून गेले आहे. आरोपी अडीच कोटी रुपयांच्या हव्यासातून राक्षस बनल्याचे समोर आले आहे.

आरोपीने मागील 20 वर्षांच्या कालावधीत हळूहळू आपल्या कुटुंबातील पाच सदस्यांचा खून केला. त्याने हे सर्व गुन्हे अशाप्रकारे केले की कोणालाही त्याच्या गुन्हेगारी कृत्यावर संशय आला नव्हता. अखेर 20 वर्षांनंतर त्याला पोलिसांनी पकडले आणि मालमत्तेच्या हव्यासातून त्याने केलेल्या सैतानी कृत्याचा बुरखा फाडला गेला. क्राइम किंवा एडव्हेंचर चित्रपटांमधील कथानकाला साजेसे कृत्य त्याने केले आहे. त्याच्या या कृत्याने सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. कुटुंबातील पाचपैकी तिघांची हत्या त्याने स्वत:च्या हाताने केली, तर दोघांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना सुपारी दिली होती, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.

लीलूने मोठा भाऊ सुधीरचा खून केल्यानंतर त्याची आठ वर्षांची लहान मुलगी पायल हिला विष देऊन ठार मारले. दोन-तीन वर्षांनी सुधीरची मोठी मुलगी पारुलची हत्या करून मृतदेह नदीत फेकून देण्यात आला. त्यानंतर मृत भावाच्या पत्नीसोबत लग्न केला. जेव्हा दोघांना मुलगा झाला, त्यानंतर त्याने सर्व मालमत्ता मुलाला मिळावी यासाठी आणखी सैतानी प्रयत्न सुरू ठेवले होते. त्याने 2009 मध्ये तिसरी आणि 2013 मध्ये चौथी हत्या केली. तसेच गेल्या महिन्यात म्हणजेच 8 ऑगस्ट 2021 रोजी त्याने दुसऱ्या पुतण्याची सुपारी देऊन हत्या केली. यातच मुलगा रागाने पळून गेल्याचे त्याने सांगितले. मात्र तरीही त्याच्या पालकांनी पोलिसात तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी संपूर्ण हत्याकांडाचा खुलासा केला.