माणुसकीला काळीमा फासणारी घटना! भिवंडीत पोटच्या मुलीवर बापाकडून बलात्कार

भिवंडी: बापाने आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने डॉक्टरांनी नराधम पित्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात ही माणुसकीला लाजवणारी घटना घडल्याची माहिती आहे. पीडिता केवळ 14 वर्षांची आहे.

भिवंडीतील भोईवाडा चाळीत राहणाऱ्या बापाने आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केला. मुलीची प्रकृती ठीक नसल्याने तिला तपासणीसाठी धामणकर नाका येतील सोनोग्राफी सेंटरमध्ये नेण्यात आले होते. त्यावेळी पीडिता गरोदर असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत डॉक्टरांनी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या वडिलांना घेऊन थेट भोईवाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तात्काळ पीडितेच्या आईला बोलावून घेत तिच्यासमोर पीडितेकडे चौकशी केली. त्यावेळी पीडित मुलीने दोन महिन्यांपूर्वी आपल्या वडिलांनी शारीरिक अत्याचार केल्याचे सांगितले. भोईवाडा पोलिसांनी नराधमाच्या विरोधात बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.