शिवसेना नेते ईडीच्या निशाण्यावर, भावना गवळींचे सहकारी सईद खान यांना ईडीकडून अटक

5

मुंबई: शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने अटक केली होती. त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. मनी लाँडरिंग अर्थात पैशांच्या अफरातफरी प्रकरणात भावना गवळी यांचा निकटवर्तीय असलेल्या सईद खानला अटक करण्यात आल्याने खासदार गवळी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

प्रताप सरनाईक, अनिल परब यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते सध्या ईडीच्या रडारवर असतानाच आता ईडीने भावना गवळी यांचे जवळचे सहकारी सईद खान यांना अटक केली आहे. भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले असून, त्याचा तपास सध्या ईडीकडून केला जात आहे.

भावना गवळी यांच्या आईसह सईद खान हे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचे संचालक होते. २०१९ मध्ये या संस्थेला फर्ममध्ये सामील करून घेण्यात आलं. त्यापूर्वी ट्रस्ट होती. या ट्रस्टमध्ये स्वतः भावना गवळी आणि त्यांची आई शालिनीताई या सदस्य होत्या. ट्रस्टचे रुपांतर फर्ममध्ये करत असताना धर्मादाय आयुक्तालयात फसवणूक केली गेली असल्याचा ईडीला संशय आहे. त्याचबरोबर फर्मचा वापर फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसाठी केल्याचाही संशय आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भावना गवळी यांच्याशी संबंधित या ट्रस्टच्या व्यवहारात १७ कोटींची अनियमितता आढळून आली आहे. सामाजिक कार्यकर्ते हरीश सारडा यांचा आरोप आहे की, भावना गवळी यांनी बालाजी सहकारी पार्टिकल मंडळाच्या माध्यमातून ४३.३५ कोटी रुपयांचं कर्ज घेऊन राष्ट्रीय सहकारी विकास परिषदेची फसवणूक केली आहे. भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून दहा वर्षांसाठी पैसे घेतले होते. पण प्रत्यक्षात कंपनी सुरूच केली गेली नाही,’ असा सारडा यांनी आरोप केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.