कोलकाताचा राजस्थानवर हल्लाबोल, ८६ धावांनी विजय
शारजा: राजस्थान रॉयल्स विरुद्धची कोलकाता नाईट रायडर्सची मॅच एकतर्फी झाली. कोलकाताने ही मॅच ८६ धावांनी जिंकली आणि १४ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथे स्थान पटकावले. आता मुंबईला त्यांच्या प्ले ऑफ राउंडच्या अखेरच्या मॅचमध्ये मोठ्या फरकाने जिंकावे लागेल. अन्यथा कोलकाता पुढल्या फेरीत प्रवेश करणार हे निश्चित आहे.
शारजात झालेल्या प्ले ऑफ राउंडच्या ५४व्या मॅचमध्ये टॉस जिंकून राजस्थानने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना भोवला. कोलकाताने वीस ओव्हरमध्ये चार बाद १७१ धावा केल्या. नंतर फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानला कोलकाताने १६.१ ओव्हरमध्ये ऑल आऊट केले. राजस्थानला फक्त ८५ धावा करणे जमले. या मॅचमध्ये ३.१ ओव्हर टाकून २१ धावा देत राजस्थानच्या चार फलंदाजांना बाद करणारा शिवम मावी मॅन ऑफ द मॅच झाला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताकडून शुभमन गिलने ५६, वेंकटेश अय्यरने ३८, नितिश राणाने १२, राहुल त्रिपाठीने २१, दिनेश कार्तिकने नाबाद १४, इऑइन मॉर्गनने नाबाद १३ धावा केल्या. राजस्थानकडून चेतन सकारिया, ख्रिस मॉरिस, राहुल तेवतिया आणि ग्लेन फिलिप्सने प्रत्येकी एक विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानची दाणादाण उडाली. यशस्वी जयस्वाल, अनुज रावत आणि ख्रिस मॉरिस हे तिघे शून्यावर बाद झाले तर मुस्तफिझुर रेहमान शून्यावर नाबाद राहिला. लियाम लिव्हिंगस्टोनने ६, संजू सॅमसनने १, शिवम दुबेने १८, ग्लेन फिलिप्सने ८, राहुल तेवतियाने ४४, जयदेव उनाडकटने ६, चेतन सकारियाने (धावचीत) १ धाव केली. कोलकाताकडून शिवम मावीने ४, लॉकी फर्ग्युसनने ३, शाकिब अल हसन आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी एक विकेट घेतली.