पेट्रोल-डिझेलचे दर भिडले गगनाला! सलग चौथ्या दिवशी दरात वाढ

मुंबई: पेट्रोलियम कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. डिझेलची किंमत ३५ पैसे प्रति लीटरने वाढली आहे, तर पेट्रोलची किंमत ३० पैसे प्रति लीटरने वाढली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल १०३.५४ रुपये प्रति लीटरवर पोचले आहे. तर डिझेलची किंमत ९२.१२ रुपये प्रति लीटर झाली आहे. देशाच्या इतरही शहरांमध्ये आणि भागांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. हैदराबादमध्ये पेट्रोलची किंमत १०७.४१ रुपये प्रति लीटरवर पोचली आहे आणि डिझेलची किंमत १००.१३ रुपये प्रति लीटरवर पोचली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

हैदराबादमध्ये १४ जूनला पेट्रोलच्या किंमतीने १०० रुपये प्रति लीटरचा टप्पा पार केला होता. तेव्हापासून पेट्रोलच्या किंमतीत जवळपास ८ रुपये प्रति लीटरची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमती जवळपास ५ रुपयांनी वाढल्या आहेत. ४ मेपासून इंधनाच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होते आहे. पेट्रोलच्या किंमतीत १३ रुपयांपेक्षा जास्त आणि डिझेलच्या किंमतीत ११ रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ करावी लागली असल्याचे म्हटले आहे. मुंबईसह सर्व महानगरांमध्ये इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत १०९.५४ रुपये प्रति लीटर आहे तर बंगळूरूमध्ये पेट्रोलची किंमत १०७.१४ रुपये प्रति लीटर आहे. विविध राज्यांमधील करांचे दर वेगवेगळे असतात त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीदेखील वेगवेगळ्या असतात.