अजित पवार आणि निकटवर्तीयांवर छापेमारी, संजय राऊत म्हणतात…
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह त्यांच्या तीन बहिणी तसेच त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या निकटवर्तीयाच्या नंदूरबारमधील साखर कारखान्यावर धाड मारण्यात आली आहे. आयकर विभागाने काल 12 तास या कारखान्यात झाडाझडती घेतली. त्यानंतर आज सकाळीही छापेमारी सुरू केली आहे. साखर कारखान्याच्याबाहेर मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
ही राजकीय छापेमारी असेल किंवा आयकर असेल, सीबीआय असेल, ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये छापेमारी सुरू आहे, हे सुडाचे राजकारण आहे. काय होईल सांगता येत नाही. अजित पवार यांच्यावर राजकीय राग असू शकतो. एखाद्या कुटुंबावर राजकीय कुटुंबावर अशाप्रकारे दहशत निर्माण करणारी छापेमारी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर सुरू आहे. हेही दिवस निघून जातील, दिल्लीत आमचेही दिवस येतील, अपना टाईम भी आयेगा, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
जरंडेश्वर साखर कारखान्यासह आंबालिका शुगर, दौंड शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर या खासगी साखर कारखान्यांवर देखील आयकर विभागाने छापा मारला आहे.
त्यातील एक आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दौंड शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी या कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांना देखील आयकर विभागाने चौकशीसाठी बोलावलं आहे. वीरधवल जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे. मात्र अजित पवारांचा या कारखान्याशी कोणताही थेट संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या सगळ्या प्रकरणी आता अजित पवारांनी देखील पुण्यात सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘आयकर विभागाने कुणावर छापा मारावा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना कोणावर शंका आल्यास ते छापेमारी करु शकतात. आज माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यावर देखील छापेमारी करण्यात आली आहे.’