मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर दणदणीत विजय, इशान-सूर्यकुमारची तुफान फटकेबाजी

मुंबई: आयपीएलमध्ये काल मुंबई इंडियन्सनं साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 42 धावांनी विजय प्राप्त केला. प्ले-ऑफमध्ये धडक मारण्यासाठी मुंबई इंडियन्सनं सनरायझर्सवर 170 हून अधिक धावांनी मात करणं गरजेचं होतं. पण यात मुंबईला यश आलं नाही आणि 14 गुणांसह मुंबईला गुणतालिकेत पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.

मुंबईने या सामन्याची सुरुवात धमाकेदार केली होती. किशनने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने 5.2 षटकात 80 धावांची सलामी दिली. यामध्ये रोहितचं योगदान केवळ 18 धावांचं होतं. रोहितला राशिद खानने माघारी धाडलं. त्यानंतर आलेला हार्दिक पंड्यादेखील (10) मोठी खेळी करु शकला नाही. पंड्यांनंतर कायरन पोलार्ड 13 धावांचं योगदान देऊन माघारी परतला.

मात्र इशान किशनने प्रत्येक गोलंदाजाची धुलाई सुरुच ठेवली. त्याने अवघ्या 32 चेंडूत 84 धावांची खेळी केली. या खेळीत 11 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने सामन्याची सूत्र हाती घेतली. त्यानेदेखील हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. सूर्यकुमारने 40 चेंडूत 82 धावांची खेळी केली. या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. या दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!