अखेर राज्य महिला आयोगाला मिळाला अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला नेत्याची निवड

पुणे: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाली, असून लवकरच औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे.  राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना पहाता हे पद रिक्त गेली दीड वर्ष रिक्त ठेवल्याने विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळे आणि विविध शासकीय पदावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. भाजपने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती केली होती. ही नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते.

गेल्या काही महिन्यात महिला अत्याचाराच्या व सामूहिक अत्याचाराच्या घटना पुढे आल्या. त्यामुळे महाविकास आघाडीवर टीका होत आहे. त्यात राज्य महिला आयोगाच्या नियुक्त्यांचा मुद्दाही प्रामुख्याने पुढे आला आहे. त्यामुळे चाकणकर यांची नियुक्ती केली जाणार असून त्यावर महाविकास आघाडीत एकमत झाले आहे. अन्य महामंडळावरील नियुक्त्याही लवकरच केल्या जाणार असल्याचे समजते.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मागील काही महिन्यांपासून महिला आयोग अध्यक्षपद रिक्त होते. या महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले होते. परंतु काँग्रेसनेही महिला आयोग उपाध्यक्षपदावर दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद गेल्यास दोन नावांची जोरदार चर्चा सुरु होती. ते म्हणचे माजी आमदार विद्या चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या दोन नावांची चर्चा आघाडीवर आहे. तर माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार यांचेही नाव चर्चेत आहे. काँग्रेसने महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नावाची शिफारस केली होती परंतु ही शिफारस मागे पडली असल्यामुळे अध्यक्षपद कोणाकडे जातंय हे पाहणं महत्त्वाचे ठरणार होते. अखेर आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे.

मुंबईत काही दिवसांपुर्वी साकीनाका येथे घडलेल्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. कोरोना काळात कोविड सेंटर आणि इतर ठिकाणी महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. साकीनाका येथील एका पीडितेवर बलात्कार झाला होता यानंतर पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्य सरकार महिला सुरक्षेच्या प्रश्नावर कठोर भूमिका घेत आहे. यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर सक्षम महिला पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते.