चित्रा वाघ यांच्या टिकेला, रुपाली चाकणकर यांचे प्रतिउत्तर

पुणे: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाली, असून लवकरच औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे.  राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना पहाता हे पद गेली दीड वर्ष रिक्त ठेवल्याने विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु यावरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यांनी एक ट्विट केलंय. त्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्ती संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मला याबाबत कोणतीच कल्पना नाही, असं सांगितलं. ज्या गोष्टीची माहितीच नाही त्याबद्दल वक्तव्य करणं चुकीचं आहे, असं चाकणकर म्हणाल्या.

संघटनेची महिला अध्यक्ष म्हणून उत्तम रित्या काम चालू आहे. मनाला समधान आहे, असे त्या म्हणाल्या. चित्रा वाघ यांनी केलेल्या टि्वटबद्दल विचारले असता चाकणकर म्हणाल्या की, चित्रा वाघ यांच्या टि्वटबद्दल मला काही बोलायचं नाही तसंच महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची कुठलीच कल्पना नाही असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले.

चित्रा वाघ यांनी काय टि्वट केलं आहे?

महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, असं टि्वट चित्रा वाघ यांनी केलं आहे.