पिंपरी: राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी नगरसेवकांची घर वापसी; शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत घरवापसी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बहिरवाडे यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यावेळी उपस्थित होते.

नारायण बहिरवाडे 1997 साली पहिल्यांदा चिंचवड स्टेशन प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2012 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शाहूनगर, संभाजीनगर प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. आगामी महापालिका निवडणूक चार महिन्यांवर आली आहे. त्यापार्श्वभूमीवर बहिरवाडे यांनी घरवापसी केली. शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व नेत्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सर्वांनी स्वगृही येण्याचा आग्रह केला. अजितदादांनी खूप आपुलकीने पक्षात स्वागत केले. त्यांचे मी आभार मानतो. स्वगृही परतल्याचे समाधान आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारणार असल्याचे बहिरवाडे यांनी सांगितले.