विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी एकदिलाने काम केल्याने मोठे यश मिळाले… कार्यकर्त्यांच्या परिश्रमाबद्दल चंद्रकांतदादांनी व्यक्त केली कृतज्ञता!
पुणे : महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून आशीर्वाद दिले. पुण्यात आठपैकी सात विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी झाले. या विजयासाठी महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कारासह महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या कामाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज भाजपा पुणे शहराच्या वतीने स्नेह मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाटील यांनी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी एकदिलाने काम केल्याने मोठे यश मिळाले. या यशाचा आनंदोत्सव आपण साजरा करत आहोत. पाच माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला, ही देखील आनंदाची बाब आहे, अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.
यावेळी राज्यसभेच्या खासदार मेधा ताई कुलकर्णी, मा. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर,पुणे शहरातील सर्वच आमदार,महायुतीचे सर्व शहराध्यक्ष, सर्व नेते,नगरसेवक,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.