ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश

मुंबई: साखळी फेरीतल्या पहिल्या सामन्यापासून विजयी सूर गवसललेल्या बाबर आझमच्या पाकिस्तानी संघाचं वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात आलंय. उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानवर ५ विकेट राखून मात करत अंतिम फेरीचं तिकीट बूक केलं आहे. १७७ धावांचं आव्हान एका क्षणाला अशक्य वाटत असताना स्टॉयनिस आणि वेड यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे काही क्षणांमध्ये सोपं होऊन गेलं. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे.
यामध्ये 17 चेंडूत 41 धावांची तुफान खेळी करणारा मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने 19 व्या षटकात शाहीन आफ्रिदीला सलग तीन षटकार मारून अशक्यप्राय विजय खेचून आणला.
ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर मार्शने 28 धावा केल्या. स्टोईनिसने 40 धावांवर नाबाद राहत विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. त्याच्या बळावर पाकिस्तानने दिलेलं 177 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 19 व्या षटकातच गाठण्यात यश मिळवलं. 26 धावांत 4 बळी घेणारा शादाब खान ऑस्ट्रेलियाला रोखू शकला नाही.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 4 बाद 176 धावा केल्या. त्यांच्याकडून मोहम्मद रिझवान आणि फखर जमान यांनी अर्धशतके झळकावली. रिझवान 52 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 67 धावा करून बाद झाला. फखर जमानने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 32 चेंडूंत त्याने नाबाद 55 धावांची खेळी केली.