पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय; भारताचा दारुण पराभव

2

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी२० विश्वचषक स्पर्धेत सुपर १२ चा सामना खेळवला गेला. पाकिस्तानने हा सामना दहा गडी राखून सहज जिंकला. भारताने दिलेले १५२ धावांचे आव्हान पाकिस्तानने सहज पार केले. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान संघाने भारताला निर्धारित २० षटकात १५१ धावांवर रोखले. त्यांनंतर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत अठराव्या षटकात विजयाला गवसणी घातली.

कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी दमदार खेळी करत भारतीय संघाविरुद्ध एक विक्रम देखील नोंदवला आहे. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरुद्ध सर्वोच्च सलामी भागीदारी रचली आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी १५२ धावांची अभेद्य भागीदारी रचली. दोन्ही सलामीवीरांनी दमदार अर्धशतके झळकावली.

या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. प्रथम विराट कोहलीने नाणेफेक गमावली. त्यानंतर भारतीय संघाने सहा धावांच्या आत रोहित शर्मा (०) आणि केएल राहुल (३) या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या. सूर्यकुमार यादवने ११ धावा करून बाद झाला त्याला हसन अलीने बाद केले. ५० धावा करण्यासाठी भारतीय संघाला तब्बल ९ षटके लागली. रिषभ पंतला लेगस्पिनर शादाब खानने बाद केले. पंतने ३० चेंडूत ३९ धावा केल्या. कोहलीने ४५ चेंडूत अर्धशतक झळकावले, तर, सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रवींद्र जडेजा १३ धावा करून बाद झाला.

पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांनी पाकिस्तानला एकहाती सामना जिंकवून दिला. दोघांनी अर्धशतक झळकावले. बाबर आझमने ५२ चेंडूत ६८ धावा केल्या तर मोहम्मद रिझवानने ५५ चेंडूत ७९ धावा केल्या. पाकिस्तान संघाने १७.५ षटकात भारतीय संघाने दिलेले १५२ धावांचे आव्हान पार केले.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.