‘मिशन विदर्भ’ आजपासून शरद पवार चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर

1

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आजपासून चार दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या गडात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. चार दिवसांत शरद पवार नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या भेटी आणि सभा घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकीच्यादृष्टीने राज्यभर दौरे सुरू केले आहेत. लोकसभा निवडणुकीला दीड वर्ष व विधानसभेसाठी दोन वर्ष असले तरी नेत्यांची तयारी सुरू झाली. पक्षाचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व विविध आघाड्यांच्या प्रमुखांनी दिवाळीपूर्वी नागपूरचा दौरा केला. विदर्भातील त्यांच्या दौऱ्याचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच दस्तुरखुद्द शरद पवार येत आहेत.

राष्ट्रवादीने निवडणुकीच्या बरेच आधी विदर्भात दौरे केले. गेल्या निवडणुकांपूर्वीही असेच मेळावे घेतले. प्रत्यक्षात निवडणुकीच्या काळात मात्र, या भागावर लक्ष केंद्रित करण्यात येत नाही. महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या बऱ्याच आधी पवार यांच्या उपस्थितीत मेळावा झाला होता. पुढच्या आठवड्यातील दौऱ्यात त्यांनी चारच जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

शरद पवार आज सकाळी येथे आगमन झाल्यानंतर ते लगेच गडचिरोलीला रवाना होतील. कार्यकर्त्यांचा मेळावा आणि जिल्ह्यातील प्रमुख नेते व इतरांशी संवाद साधतील. रात्री चंद्रपूरला मुक्काम असून १६ तारखेला मेळावा होणार आहे. रात्री यवतमाळला मुक्काम करतील. यवतमाळ जिल्ह्यात फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची ते १७ तारखेला भेट घेतील. दुपारी मेळावा आणि नेत्यांशी चर्चा करतील. रात्री वर्धे येथे मुक्काम असून १८ तारखेला मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.