मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरण: प्रवीण दरेकरांना कोर्टाचा दिलासा; कारवाई न करण्याचे आदेश

4

मुंबई: मुंबै बँक घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने भाजपचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिलासा दिला आहे. न्यायालयाने मुंबई आर्थिक गुन्हे शाखेला २ डिसेंबर २०२१ पर्यंत प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करु नये असे निर्देश दिले आहेत.

भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांच्या तक्रारीवरून मुंबै बँकेचे अध्यक्ष दरेकर यांच्यासह मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर, EOW ने १८ जानेवारी २०१८ रोजी किल्ला कोर्टात अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर C-सारांश अहवाल दाखल केला. गुप्ता यांना बोलावले असता त्यांनी अहवालाबाबत कोणतीही तक्रार नसल्याचं सांगितलं

तथापि, पंकज कोटेचा नामक व्यक्तीने C-सारांश अहवालाला विरोध करणारी याचिका दाखल केली. या तक्रारीत EOW ने त्यांच्या २०१४ च्या तक्रारीचा विचार केला नाही असं म्हणत त्या तक्रारीची चौकशी करण्याची मागणी केली. या याचिकेनंतर, अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी १६ जून २०२१ रोजी C-सारांश अहवाल नाकारला आणि तपास अधिकाऱ्यांना पुढील तपास करण्याचे निर्देश दिले.

प्रवीण दरेकर यांनी सत्र न्यायालयात कोटेचा यांचे अनेक गैरप्रकार आणि खोटेपणा समोर आणून त्यांना आव्हान दिले होते. त्यानंतर ५ ऑक्टोबर २०२१ रोजी सत्र न्यायालयाने फेरविचार अर्ज फेटाळला. यानंतर दरेकर यांनी सध्याच्या रिट याचिकेसह वकील अखिलेश चौबे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. दरेकर यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे की, न्यायालय केवळ तक्रारदाराला नोटीस बजावते, त्यामुळे केवळ तक्रारदारालाच अहवालाच्या विरोधात याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की कोटेचा यांना एफआयआरच्या विषयाची वैयक्तिक माहिती नाही, ते शेअरहोल्डर नव्हते किंवा कर्जदा म्हणून त्यांचा बँकेशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे ते याचिका दाखल करु शकत नाहीत.

Get real time updates directly on you device, subscribe now.